Description
स्थळाचे नाव: शिवपट्टण उर्फ खर्ड्याचा भुईकोट , खर्डा
स्थळ महात्म्य: हिंदवी स्वराज्यातील ऐतिहासिक शेवटची लढाई या किल्ल्याभोवता लढली गेली
ठिकाणाचा प्रकार: किल्ला
माहिती: हिंदवी स्वराज्यातील ऐतिहासिक शेवटची लढाई ज्या किल्ल्याभोवती लढली गेली तो किल्ला म्हणजे खर्डा येथील शिवपट्टण उर्फ खर्ड्याचा भुईकोट किल्ला. हैदराबादचा निजाम व मराठ्यांमध्ये ११ मार्च १७९५ रोजीही लढाई झाली. या लढाईत मराठ्यांच्या फौजांनी हैदराबादच्या निजामाचा पराभव केला. दौलतराव शिंदे यांची सेना पुणे येथे असताना मराठा सत्तेचा प्रभाव दक्षिणेत वाढविण्यासाठी नाना फडणवीस यांनी हैदराबादच्या निजामावर लक्ष केंद्रीत केले व त्याच्याकडे थकलेल्या चौथाईची मागणी केली. निजामाचा मंत्री मुशीरमुल्कने ही मागणी फेटाळून लावत भोसल्यांच्या वऱ्हाडातील महसूलही नाकारला. परिणामी पेशवे, दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर आणि दुसरा रघुजी भोसले यांच्या फौजांनी मार्च १७९५ मध्ये निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केले. मराठ्यांनी निजामावर आक्रमण केल्यावर निजामाने ब्रिटिशांकडे मदत मागितली परंतु ब्रिटिशांनी मदत नाकारली आणि त्यामुळे खर्डा येथे ही निर्णायक लढाई झाली.
मराठ्यांशी उघड्या मैदानावर तोंड देण्याचे टाळत निजामाने खर्डा किल्ल्याचा आश्रय घेतला. मराठ्यांनी खर्ड्याच्या किल्ल्याला वेढा दिला आणि किल्ल्याला होणारी रसद थांबवून तटबंदीभोवती तोफा रचल्या. शेवटी निजामाने १३ मार्च १७९५ रोजी तह करुन लढाईतून माघार घेतली. या तहानुसार निजामाने मराठ्यांना पाच कोटी रूपये थकलेल्या चौथाई आणि युद्धखंडणीपोटी देण्याचे मान्य केले तसेच स्वत:च्या ताब्यातील एक तृतीयांश प्रदेश मराठ्यांच्या स्वाधीन केला व दौलताबादचा किल्ला व त्याचा प्रदेश पेशव्यांना देण्यात आला याशिवाय वऱ्हाडचा प्रदेश महसूलासहित नागपूरच्या भोसल्यांना देण्यात आला. या लढाईत मालोजी घोरपडे, दौलतराव शिंदे, सवाई माधवराव पेशवे नागपूरचे रघुजीराजे भोसले आणि खर्डा येथील जहागीरदार सरदार सुलतानराजे निंबाळकर’ यांनी पराक्रम गाजविला आणि निजामाला धूळ चारली.
किल्ल्याच्या बांधकाम व स्थापत्यशैलीबद्दल माहिती –
चौकोनी आकाराचा हा किल्ला ५ एकरमध्ये पसरलेला असून रस्त्याच्या बाजूने पश्चिम दिशेला असणारे किल्ल्याचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार सहजपणे दिसून येत नाही. रणमंडळ, किल्ला, रेवणी व खंदक अशी संरक्षक रचना असणाऱ्या या भुईकोटाच्या मुख्य तटबंदीत चार टोकाला चार, दरवाजाशेजारी दोन व रणमंडळात एक असे सात बुरूज आहेत. संपूर्ण किल्ल्याभोवती खंदक असून दरवाजाच्या बाजूने असलेला खंदक बुजवल्याने गाडी किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाते. शत्रूला थेट किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला भिडता येऊ नये यासाठी मुख्य दरवाजासमोर आडवी तटबंदी घालून त्या तटबंदीत एक बुरूज व दुसरा दरवाजा बांधून रणमंडळाची रचना केली आहे. हा दरवाजा देखील दोन बुरुजांमध्ये संरक्षित झाला आहे. हे बांधकाम मुख्य किल्ला बांधल्यानंतरच्या काळात झाले असावे. या दरवाजावर एक पर्शियन शिलालेख आहे. पहिल्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर उजवीकडे गडाचा साधारण तिस-चाळीस फूट उंचीचा मुख्य दरवाजा असून या दरवाज्यावर मराठीतील एक शिलालेख आहे. या शिलालेखानुसार हा किल्ला १७४३ मध्ये सरदार सुलतानराव निंबाळकर यांनी बांधला. दरवाजासमोरील रणमंडळाच्या दोन बाजूंना ओवऱ्या बांधलेल्या असून येथे बाहेरील तटावर चढण्यास पायऱ्या दिसून येतात. किल्ल्याचा दुसरा दरवाजा व त्याच्या आतील भागातील बांधकाम आजही सुस्थितीत आहे. या दरवाजाच्या आतील भागात घुमटाकृती बांधकाम व किल्ल्याच्या अंतर्गत भागात जाण्यास तिसरा दरवाजा आहे. दरवाजाच्या आतील भागात पहारेकऱ्याच्या देवड्या आहे. त्यातील एका देवडीत असलेल्या पायऱ्यांनी किल्ल्याच्या दरवाजावरील भागात जाता येते. दरवाजातून आत प्रवेश केल्यावर संपूर्ण किल्ला व त्यातील मोकळे मैदान दिसते. किल्ल्यावरील वास्तूची पडझड झाली आहे. सर्व अवशेष नामशेष झाले आहेत. परंतु ते सर्व पुर्ववत करण्यासाठी जोरदार काम चालू आहे. दरवाजाच्या आत उजवीकडे तटबंदीवर जाण्यासाठी जिना आहे. यावर चढून किल्ल्याच्या पूर्ण तटबंदीला फेरफटका मारता येतो. तटावर ये-जा करण्यासाठी तटबंदीमध्ये ठिकठिकाणी पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरताना खंदक व रेवणी यांच्यात असणाऱ्या परकोटात ढासळलेले लहान आठ बुरूज व तटबंदी आजही काही प्रमाणात पहायला मिळतात. उरलेले बुरुज मात्र पूर्णपणे नष्ट झाले आहेत.
किल्ल्याच्या मध्यभागी एका ढासळलेल्या वाड्याचे अवशेष आहे. त्यात मातीखाली गाडलेल्या ओवऱ्या दिसतात. किल्ल्याच्या पूर्व बाजूला तटबंदीकडे सुस्थितीत एक इमारत आहे. त्यावर जामा मशीद असा उल्लेख असणारा पर्शियन शिलालेख आहे. या इमारतीशेजारी एका फुटलेल्या तोफेचा मागील भाग पहायला मिळतो. मशीद आणि तटबंदी यांच्यामध्ये स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेली दगडाने बांधलेली चिरेबंदी व सुस्थितीत असलेली बारव पहायला मिळते.
ही बारव किल्ल्यातील पाण्याचा एकमेव स्त्रोत असून सध्या याच विहीरीतून किल्ल्याच्या दुरूस्ती कामासाठी पाणी उपसा होत आहे. गोलाकार आकाराच्या १०० फुटापेक्षा जास्त खोल असणाऱ्या या विहिरीच्या वरील बाजूस पाणी उपसा करण्यासाठी दगडी मोट आहे. पाणी जास्त खोल गेल्यास विहीरीत उतरण्यासाठी दुसऱ्या बाजूने विहीरीच्या मध्यापर्यंत दगडी जिना आहे. साधारण ४० पायऱ्या उतरल्यावर विहिरीच्या आतील बाजूस ५x५ आकाराची खोली आहे. तिला विहिरीच्या बाजूने कमान आहे. किल्ल्याच्या दक्षिण तटबंदीत संकटकाळी किल्ल्यातून बाहेर पडण्यास एक लहानसा दरवाजा आहे पण तो सध्या दगडांनी बंद केलेला आहे. याशिवाय किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूच्या बांधकामात दोन कोठारे व काही भुयारं पहायला मिळतात. त्यात शिरण्यासाठी किल्ल्याच्या आतील बाजूने दरवाजे आहेत. संपूर्ण किल्ला पहाण्यास एक तास पुरेसा होतो. किल्याच्या तटबंदीवरुन फिरतांना पूर्ण खर्डा गावच्या आजूबाजूचा परिसर तेथून न्याहाळता येतो.
सण/उत्सव:
स्थानिक वैशिष्ट्ये:
- कोणत्याही ऋतुमध्ये हा किल्ला तुम्ही पाहू शकता.
- बस स्टॉप जवळ मिळणारी गोड पापडी शेव शेंगदाणा खायला खूप कुरकुरीत व स्वादिष्ट लागते. या पापडीस जिल्हाभरातून प्रचंड मागणी असून खवय्यांची विशेष पसंती मिळते.