कर्जत जामखेडकर
- Home
- कर्जत जामखेडकर
कर्जत जामखेडकर
अहमदनगर जिल्हा तसा पाणी आणि हिरव्यागार शेतीसाठी प्रसिद्ध पण याच जिल्ह्यातील कर्जत व जामखेड या दोन तालुक्यात पाण्याची परिस्थिती थोडी अवघडच. पावसाची अवकृपा त्यामुळे शेतीतून मिळणारं अल्प उत्पन्न, उन्हाळा आला की निर्माण होणारी पिण्याच्या पाण्याची अडचण, सातत्याने अनेक वर्षांपासून पडणारा दुष्काळ, वाढणारी बेरोजगारी या सगळ्या समस्यांसोबत धीराने लढत लढत लढाऊ बाण्याच्या कर्जत-जामखेडकरांनी अनेक जोडव्यवसाय निर्माण करुन या संकटांशी गेली अनेक वर्षे यशस्वी सामना केला आहे.
बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वयंरोजगाराची निर्मिती केली तर बरेच तरुण तरुणी स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु करत आहेत. कोणी अस्सल चामड्याच्या चपलांची निर्मिती करुन त्यांची विक्री करतायत तर काही महिला गोधड्या शिवून त्यांची विक्री करत आहेत.
काही महिलांनी हस्त कलेमधून किंवा हातमाग यातून विविध वस्तूंची निर्मिती व विक्री करुन स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. लाकडी बैलगाड्या, शोभेच्या वस्तू बनवून काही भगिनी आज घर चालवण्यात मोलाचा हातभार लावत आहेत तर सिद्धटेक येथील काही चर्मकार बंधूंनी बनवलेल्या सुंदर अशा बेल्ट – पॉकेट मधून आपल्या भागाची एक वेगळी ओळख जपली आहे.
बऱ्याच कर्जत जामखेडकर तरुणांनी, माताभगिनींनी पारंपारिक व्यवसायाला नाविन्याची जोड देऊन वैविध्यपूर्ण अभिनव उपक्रम सुरु केले आहेत.