सामाजिक संस्था
- Home
- सामाजिक संस्था
श्री शक्ती महिला बचत गट
पठारवाडी, ता. कर्जत.
या बचत गटाचं वैशिष्ट्य असं की मडक्यात शिजवलेल अप्रतिम चिकन आणि सोबतीला चुलीवरची खरपूस भाकरी. बचत गटाच्या माध्यमातून या महिला ठिकठिकाणी जिथे संधी मिळेल त्या खाद्यमहोत्सवांमध्ये सहभागी होतात. तिथल्या खवय्यांना हे चविष्ट चिकन व भाकरी बनवून देतात. यातून श्री शक्ती महिला बचत गटाच्या अनेक महिला आज स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत.
महिला बचत गट
पठारवाडी, ता. कर्जत.
या महिलांच्या गटामध्ये शेती नसलेल्या अनेक महिला एकत्र आल्या आणि त्यांनी हा बचत गट स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करण्यासाठी चालू केला. मडक्यातील शिजवलेल चिकन आणि सोबतीला चुलीवरची भाकरी आपल्या बचत गटाच्या स्टॉलवर ह्या महिला उपलब्ध करुन देतात. दुसऱ्याचा शेतात रोजंदारी करुन ६ महिन्यात जेवढे पैसे मिळत नाहीत तितके पैसे ४ दिवसाच्या स्टॉलवर थांबून, प्रामाणिक विक्री करुन या गटातील महिला आज स्वतःच्या व्यवसायातून कमवत आहेत.
चौंडीश्वरी फुड प्रॉडक्ट
भैरुबावाडी, ता. कर्जत.
संतोष गुरसाळे यांनी खारी पापडी, मसाला शेंगदाणे यांची चटकदार भेळ बनवून या चौंडीश्वरी फुड प्रॉडक्टस बनवून वेगळे स्थान निर्माण केले. एकदा ही पापडी खाल्ली तर त्याची चव जिभेवर रेंगाळते व त्याच्यातला खुसखुशीतपणा आपल्याला या पापडी भेळच्या प्रेमात पाडल्याशिवाय राहत नाही. पुणे येथे भरवलेल्या भिमथडी जत्रेत्त तर त्यांच्या स्टॉलवर विक्रमी विक्री झाली. पुणेकर खवय्यांची विशेष पसंती मिळवली. आजही खर्डा येथे व पंचक्रोशीमध्ये चौंडीश्वरी फुड प्रॉडक्टची पापडी भेळ अनेक खाद्यप्रेमी चाहते भेटतात.
जय जगदंबा महिला बचत गट
बेनवडी, ता. कर्जत.
या बचत गटातील महिलांच्या मुलींच्या शिक्षणाची पुढील फी भरता येत नसल्याने तिचं लग्न करावं लागले आणि यातून प्रेरणा मिळाली की आपण स्वतः काहीतरी व्यवसाय केला पाहिजे आणि जेणेकरुन सर्व महिलांना एकत्र आणून हा बचत गट निर्माण केला. घरच्या उखळावर कांडलेला मसाला वापरुन यांनी तयार केलेला मांसाहार हे या बचत गटाचं वैशिष्ट्य आहे. सगळ्याच खाद्यमहोत्सवांमध्ये जय जगदंबा महिला बचत गटाच्या स्टॉलवर चिकन खाण्यासाठी खवय्ये गर्दी करतात व आस्वाद लुटतात.
सावित्रीबाई फुले महिला बचत गट
बांदखडक, ता. जामखेड.
महिला असलो म्हणून आपण चूल आणि मूल यातच न अडकता बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे ही प्रेरणा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याकडून घेतली आणि सावित्रीमाईंचे नाव आपल्या बचत गटाला देऊन या कष्टाळू व जिद्दी महिलांनी बचत गट स्थापन केला. स्वतः घरी तयार केलेला मसाला व नगरी पध्दतीचं चिकन मटन आज या महिला विविध ठिकाणी स्टॉल लावून विकतात व स्वतः मिळवलेल्या पैश्यातून आज घर अगदी सशक्तपणे चालवत आहेत.
गुरुकृपा महिला बचत गट
भैरुबावाडी, ता. कर्जत.
शेतीतून निघणारं अत्यल्प उत्पन्न, त्यातून रोजची होणारी ओढाताण मग यावर उपाय म्हणून स्वयंरोजगार निर्मिती आपण केली पाहिजे या हेतूने कमलताई तांदळे आणि त्यांच्या सहकारी महिलांनी हा बचत गट सुरु केला. स्वतः जवळ भांडवलासाठी पैसे नसताना आपल्या हाताची स्वयंपाकातील चव यालाच आपलं बलस्थान मानून या महिलांनी जेवण बनवायला सुरुवात केली आणि अळणी भात, भाकर व सोबतीला चटकदार चिकन असा स्टॉल त्यांनी ठिकठिकाणच्या खाद्यमहोत्सवांमध्ये लावायला सुरवात केली. आज जिथे गुरुकृपा महिला बचत गटाचा स्टॉल असतो तिथे यांच्या चिकन व अळणी भाताला विशेष मागणी असते.
सिध्दी महिला बचत गट
परीटवाडी, ता. कर्जत.
‘आपल्या रोजच्याच आहारातील पदार्थ यांनाच आपण व्यावसायिक रुपात आणून त्यांची विक्री केली तर’ या विचाराने कमलताई काळे आणि त्यांच्या महिला सहकारी भगिनींनी मेथी थालीपीठ, वांग्याचे भरीत व राजस्थानी दालबाटी अशा सगळ्या पदार्थांची विक्री खाद्यमहोत्सवांमध्ये, बचत गटांच्या मेळाव्यात व यात्रांमध्ये सुरु केली. त्यातून सिद्धी महिला बचत गटाला तसा सकारात्मक प्रतिसादही मिळतोय आणि त्यामुळे आज कमलताईंसोबत सर्वच महिला खंबीरपणे घर चालविण्यास हातभार लावत आहेत.
अस्मिता महिला बचत गट
ता. जामखेड.
जामखेड येथील सोबत राहणाऱ्या अनेक महिलांना काहीतरी करु अशी इच्छा होती परंतु त्यांना योग्य संधी मिळत नव्हती. अशा वेळी उषाताईंनी या सर्व महिलांना एकत्रितपणे संधी उपलब्ध करुन दिली, महिलांनी संधीचे सोने केले आणि अस्मिता महिला बचत गटाच्या माध्यमातून शिपी आमटी, पिठलं भाकरी, ठेचा भाकरी असे अस्सल ग्रामीण पदार्थांचा स्टॉल संधी मिळेल त्या खाद्यमहोत्सवांमध्ये, बचत गट मेळाव्यांमध्ये लावायला सुरवात केली. आपण घराबाहेर पडून काहीच करु शकत नाही असा विचार असणाऱ्या महिलांना आता मनामध्ये आपण स्वतः कुटुंब चालवू शकतो, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करु शकतो हा आत्मविश्वास या कामातून निर्माण झाला आहे. अस्मिता बचत गटाची रुचकर शिपी आमटी अशी ओळख निर्माण झाली आहे.
सखी महिला बचत गट
राशीन, ता. कर्जत.
कुटुंबातील एकच व्यक्ती कमावतो व ५/६ लोकं खाणारी असतात, अशा वेळेस आपणसुध्दा या कुटुंबाच्या रहाटगाड्याला हातभार लावला पाहिजे ही भावना काही प्रसंगांमुळे या महिलांमध्ये निर्माण झाली आणि यातूनच निर्माण झाला सखी महिला बचत गट. कर्जत तालुक्याचं वैशिष्ट्य असलेली शिपी आमटी आपण सगळ्या खाद्यमहोत्सवांमध्ये बनवून लोकांना खाऊ घालायची असं त्यांनी ठरवलं आणि आज या महिला प्रत्येक ठिकाणी ही चवदार शिपी आमटी वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या खवय्यांपर्यंत सातत्याने पोहचवत आहेत.
गुरुकृपा महिला बचत गट
राशीन, ता. कर्जत.
सुनंदाताई पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भिमथडी जत्रेत एका स्टॉलवर पुणेकर कर्जत स्पेशल शिपी आमटी खाण्यासाठी विशेष गर्दी करत होते. तो स्टॉल म्हणजे गुरुकृपा महिला बचत गटाचा. आपल्या सहकारी महिला सुंदर शिपी आमटी बनवतात, ती चव आपण इतरांनाही खायला द्यावी व यातून रोजगार पण निर्माण होईल अशा भावनेने कर्जत येथील महिला एकत्र आल्या व आज शाश्वतपणे आयुष्य जगत आहेत. आज गुरुकृपा महिला बचत गटाची वाटचाल यशस्वीपणे चालू असून शिपी आमटी खवय्यांच्या पसंतीस उतरत आहे.
कल्पलक्ष्मी महिला बचत गट
परीटवाडी, ता. कर्जत.
पोहा पापड, वेफर्स, शेव, साबुदाणा पापड हे खाद्यपदार्थ कल्पलक्ष्मी महिला बचत गटाच्या माध्यमातून बनवून मोनिका तोटे व त्यांच्या सहकारी विकतात. या बचत गटाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या या गटामध्ये २ अंध महिला आहेत, ज्या आज या बचत गटामुळे स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यांना या गटात सहभागी करुन तुम्ही कुटुंबीयांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे आयुष्य सुंदर बनवू शकता व त्यासोबत कुटुंबालाही आधार देऊ शकता हा आत्मविश्वास मोनिका ताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या दोन अंध महिला भगिनींना दिला. या बचत गटाने २०१९ च्या भीमथडी जत्रेमध्ये तर पहिल्या दिवशी १५ हजाराची केलेली विक्री शेवटच्या दिवशी १ लाखापर्यंत जाऊन पोहचली.
जगदंबा अॅग्रो - व्हेजिटेबल पावडर स्पेशल
अळसुंदे, ता. कर्जत.
‘परिस्थितीला दोष न देता आपण त्याच्यावर मात करु शकतो’, हाच मंत्र स्वप्निल बरबडे यांनी आपल्या संकल्पनेतून जगदंबा अॅग्रो कंपनी निर्माण करुन सर्व लोकांना दिला. आले पावडर, मेथी पावडर, हिरवी मिरची पावडर, टोमॅटो पावडर, वाळवलेला कांदा यांची विक्री ते करतात आणि त्यांना बाजारात त्याची दिवसेंदिवस मागणी वाढते आहे. अनेक आहारतज्ञ आज जगदंबा अॅग्रो प्रॉडक्टसचे वेगवेगळे उत्पादने ऑर्डर करुन मागवतात. राशीन स्थायिक बरबडे यांची अनेक वृत्तपत्रांनी त्यांच्या या विशेष व्यवसायाची दखल घेतली. दुष्काळ, पाणी या शेतीच्या समस्यांवर मात करुन नाविन्यपूर्ण पध्दतीने व्यवसाय सुरु करणारे स्वप्निल बरबडे आणि त्यांचे सहकारी यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे व रोजगार निर्मितीसाठी प्रेरणादायी असाच आहे.
महालक्ष्मी बचत गट
अंबीजळगांव ता कर्जत जि अहमदनगर
कर्जत जामखेड या दोन तालुक्यातील पाहुणचाराचा पदार्थ म्हणजे मडक्यातलं चिकन आणि पाहुणे शाकाहारी असतील तर शिपे आमटी आणि भात. हाच शाकाहारी पदार्थ घेऊन महालक्ष्मी बचत गटाच्या भगिनींनी स्वतःचा हा व्यवसाय सुरु केला, सोबतीला त्या उत्कृष्ट पध्दतीचे थालीपिठही बनवून आपल्या गटाच्या स्टॉलवर देतात. ग्राहकांच्या ते पसंतीसही उतरतं. आम्ही स्वतः काहीतरी काम करुन स्वयंपूर्ण होऊ शकतो हा आत्मविश्वास या महालक्ष्मी बचत गटातून मिळाल्याचं येथील महिला सांगतात.
स्री शक्ती बचत गट
राशीन, ता. कर्जत.
घरी गरीबीची परिस्थिती, मिळकतीचा मार्ग आपणच शोधला पाहिजे या कल्पनेतून योगिताताईंनी काही महिलांना सोबत घेऊन हा स्री शक्ती बचत गट तयार केला. यातून एकत्र येऊन त्या हळद पावडर, जवस चटणी, कांदा लसूण मसाला असे विविध प्रकारचे मसाले आणि चटण्या घरीच व्यवस्थित पद्धतीने तयार करतात. वेगवेगळ्या माध्यमातून त्याची त्या विक्रीही करतात. कमी भांडवल वापरुन त्यांनी आज हा व्यवसाय सुरु करुन अनेक महिलांच्या मिळकतीचा प्रमुख प्रश्न सोडवला आहे.
हिरकणी महिला बचत गट
ता. कर्जत.
व्यवस्थित शिलाई, खणाच इरकल कापड, त्यावर येणारी सुबक रंगसंगत, यातून निर्माण होणारी उबदार आणि आकर्षक गोधडी ही या गुरव दांम्पत्याच्या हिरकणी महिला बचत गटाची ओळख. अतिशय काळजीपूर्वक केलेल्या बारीक शिलाईमुळे ही उबदार व तितकीच आखीव रेखीव गोधडी भिमथडी जत्रेमध्ये तर ग्राहकांच्या खूप जास्त पसंतीस उतरली. प्रचंड व्यवसाय त्यांचा या काळात झाला. तुमच्या ऑर्डर नुसार तुम्हाला प्रियंकाताई गोधड्या बनवून देतात आणि या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना रोजगारही उपलब्ध करुन दिला आहे.
नलिनी गुरव यांच्या वारली पेंटिंग्ज
राशीन, ता. कर्जत.
सुबक व काटेकोरपणे पध्दतीने बनवलेले वारली पेंटिंग्ज हे नलिनीताईंचे वैशिष्ट्ये. घर, हॉटेल, ऑफिस अशा सगळ्याच ठिकाणी शोभेच्या वस्तू म्हणून या वारली पेंटिंग्जला प्रचंड मागणी आहे. कर्जत तालुक्याच्या ठिकाणी राहून कला जोपासून त्या कलेचे रुपांतर व्यवसायात केले आहे. प्रत्येक पेंटिंग्जमधील बारकावे, त्यातील मोजमाप यांचा विचार करुन तयार केलेली नलिनी ताई यांची पेंटिंग्ज यामध्ये वेगळ्या ठरतात. कलाकार म्हणून एक स्थानही त्यांनी निर्माण केले आहे याचा आनंद वाटतो.
सिध्दीविनायक मसाला समुह.
अंबिजळगाव,ता. कर्जत.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड भागातील मसाले नगरी मसाले म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची निर्मिती करुन त्यातून सोबतच्या महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचं काम सिध्दीविनायक मसाला समुहाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. रोजगार निर्मिती सोबतच महिलांना स्वतः आपण कुटुंब चालवण्यास मदत करु शकतो हा आत्मविश्वास या बचत गटाच्या माध्यमातून मिळाला आहे.
स्वामिनी महिला बचत गट
अंबिजळगाव,ता. कर्जत.
जे मसाले आपण आपल्या कुटुंबांसाठी तयार करतोच पण तेच थोड्या जास्त प्रमाणात तयार केले आणि त्याची विक्री केली तर कुटुंबालाही थोडा हातभार लागेल या हेतूने विजयाताई शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी स्वामिनी महिला बचत गटाची निर्मिती केली. या उपक्रमात त्यांना इतरही महिला जुळल्या व आज त्याचं रुपांतर एका यशस्वी बचत गटामध्ये झाले. त्या माध्यमातून त्यांच्या मसाल्यांची लोकप्रियता वाढल्याने पंचक्रोशीतून त्यांना ऑर्डर मिळतात व त्यातून त्यांना चांगला रोजगारही उपलब्ध होतो आहे.
विजय अवसारे - हॅन्डीक्राफ्ट चप्पल समुह
स्वतः कमावलेले चामडे, त्याला वाळवून शिवून ग्राहकांच्या पसंतीची चप्पल त्याच्या हातात देईपर्यंतचा प्रक्रिया आपल्या आईवडिलांच्या मदतीने करुन आपला स्वतःचा व्यवसाय करणारा हा तरुण विजय अवसारे. नोकरी नाही, भांडवल नाही, पैसे नाही असे कोणतेही कारण न देता आपला परंपरेने चालत आलेला व्यवसाय त्यांनी नाविन्याची जोड देऊन समोर आणला आणि आज ते यामध्ये प्रामाणिकपणा आणि सातत्याच्या बळावर यशस्वीही होताना दिसत आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार, डिझाईन आणि माप घेऊन अस्सल चामड्याचे पादत्राणे बनवून देणारा नवव्यावसायिक म्हणून आज विजय अवसारे अनेक युवकांसाठी प्रेरणा ठरत आहेत.
अपर्णा सातपुते महिला बचत गट
जामखेड.
अपर्णा ताई लाकडी बैलगाड्या, लाकडी खलबत्ते व इतर लाकडी वस्तू बनवून विकतात. हा व्यवसाय सुरु करण्यामागे त्यांची एक प्रेरणादायी व संघर्षमय गोष्ट आहे. लग्नानंतर काही वर्षातच लाईटचा शॉक लागून मुलगा गेला. असा जीवघेणा प्रसंग आयुष्यात येतो न येतो तोच सासरच्या मंडळींनी या परिस्थितीतही त्यांच्यावर आळ घेतला की हे तूच केलंय. नवऱ्यासहित सासरच्या सर्व मंडळींनी त्यांची साथ सोडली. अशा कोलमडलेल्या अवस्थेत त्या धडपडत उभ्या राहिल्या, स्वत:ला सावरलं आणि उसने पैसे घेऊन बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरु केला. आज या बैलगाड्या त्या सुतार काकांकडून बनवून घेतात, त्याला स्वतः रंग देऊन त्या विकतात, त्यातून मिळणारा पैसा आणि आत्मविश्वास जगायला बळ देतो असं त्या सांगतात. प्रचंड वेदना देणारा संधीवाताचा त्रास त्याचा औषधखर्च, मानसिक त्रास या सगळ्यांवर त्या आज या बचत गटातून सुरु केलेल्या उद्योगामुळे मात करु शकल्या.