Description

स्थळाचे नाव: खंडोबा मंदिर, शेगुड

 

स्थ महात्म्य: देशातील १२ मल्हार मंदिरांपैकी एक ठिकाण शेगुड येथे आहे

 

ठिकाणाचा प्रकार: मंदिर

माहिती:

पूर्वी या ठिकाणी शेगुड नावाचे जंगल होते. जंगलातील एका चंदनाच्या खोडात ‘मी आहे’ असा दृष्टांत एका भक्ताला मिळाला, मग त्याने जाऊन तिथे ते खोड कुदळ – टिकवाच्या साह्याने खोदून त्या खोडातील खंडोबारायाची ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढली व तिथेच एक छोटे मंदिर बांधून या स्वयंभू मूर्तीची स्थापना केली. काही वर्षांतर श्री पुंडे नावाच्या जहागीरदाराने येथील मंदिराचा जिर्णोध्दार केला. मंदिराचे बांधकाम करुन त्याला भक्कम अशी दगडी तटबंदी बांधली. ३५० वर्षांपूर्वीचे असलेले हे मंदिर २ ते ३ एकरामध्ये पसरलेले आहे. येथे टेहळणीसाठी सुरक्षेच्या दृष्टीने जागा तयार केली आहे व वर जाता येईल अशी व्यवस्थाही केली आहे. तटबंदीच्या उत्तर बाजूस भव्य प्रवेशद्वार असून त्यावर तत्कालीन स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतो. एका शिलालेखावर लिखाण व नक्षीदार काम केलेले दिसते. (विजयादशमीला या द्वाराचे व तटबंदीचे बांधकाम झाले आहे, असा मजकूर त्यावर आढळतो). असेच एक भव्य प्रवेशद्वार  तटबंदीच्या व मंदीराच्या मागील बाजूस (दक्षिणेला) देखील आहे व ते फक्त सोमवती अमावस्येला उघडले जाते. मुख्य महाद्वारातून आत प्रवेश करताच समोर उंच दिपमाळ दिसते व त्यासमोर मुख्य सभामंडप नजरेस पडतो. येथील या सुंदर दगडी दिपमाळांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक उत्सवामध्ये या दिपमाळा दिव्यांनी उजळून निघतात. हे दृश्य नयनरम्य दिसते व मंदीराच्या सौंदर्यात अजून भर पडते. महाद्वाराच्या आत डाव्या बाजूला दगडी बारव खोदलेली असून आत उतरण्यासाठी पायऱ्या दिसतात. येथील पाणी फक्त देवासाठी वापरले जाते.

मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच आपल्याला सुबक सभामंडप व मोठी पितळी घंटा दिसते. गाभाऱ्यात निरव शांतता जाणवते. मंदीराच्या भोवताली असणाऱ्या तटबंदीच्या आतील बाजूस अनेक मंदिरे आहेत. तसेच दक्षिण महाद्वाराजवळ रथोत्सवात खंडेराया ज्या अश्वावर स्वार होतात तो घोडा व रथ आहे.

मुख्य गाभाऱ्यात म्हणजेच सभामंडपातून आत गेल्यावर आपल्याला खंडेरायाची एक प्रसन्न व आकर्षक मूर्ती नजरेस पडते त्यासोबत डाव्या बाजूला म्हाळसा देवी तर उजव्या बाजूला बानू देवी यांच्या मुर्त्या दिसून येतात. या मंदिराचा कळस उंच असून त्यावर नवदुर्गा व नवनाथांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत.

महाराष्ट्रातील जेजुरी, पाली, शेगुड, धावडी निमगांव, सातारे (औरंगाबाद), मोळेगांव (नांदेड), नळदुर्ग – आंदुर (उस्मानाबाद) व कर्नाटक येथील बिदर आदीमल्हार, देवरगुड्डा, मंगसुंदळी, मैलाळ, भैलारसिंग असे हे देशातील सर्व १२ मल्हार असून त्यातील एक म्हणजेच शेगुडचे खंडोबा मंदिर हे कर्जत जामखेड येथे आहे.

 

सण/उत्सव:

  • मार्गशीर्ष पोर्णिमा – दत्तजयंती – या दिवशी छबीना निघतो. घोडा सजवून त्यावरुन देवाची मिरवणूक काढली जाते.
  • विजयादशमी सीमोल्लंघन
  • चैत्र पौर्णिमा – हनुमान जयंती – या दिवशी मंदिरात जागरण गोंधळाचा कार्यक्रम होतो.
  • सोमवती अमावस्या
  • चंपाषष्ठी – अवतार दिन

स्थानिक वैशिष्ट्ये:

  • अहमदनगर जिल्ह्यातील शेगुड हे शेवटचे गाव असून त्या पुढे सोलापूर जिल्हा सुरु होतो.
  • शेगुड गावामध्ये खंडेराया गादी व घोडा वापरतो म्हणून कोणीही ग्रामस्थ झोपायला गादी व कोणत्याच प्रसंगी घोडा वापरत नाही.
  • तसेच देवाचे हे मंदिर दोन मजली आहे त्यामुळे बाकी गावात कोणीच दोन मजली घर बांघत नाही.
  • मंदीराच्या प्रांगणात असलेले चिंचेचे झाड हे जवळपास १२५ वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येते.
  • येथील भेळ प्रसिद्ध आहे.