स्थळाचे नाव: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मस्थळ, स्मारक व चित्र सृष्टी, चौंडी
स्थळ महात्म्य: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मस्थळ
ठिकाणाचा प्रकार: जन्मस्थळ, स्मारक व चित्र सृष्टी
माहिती:
अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. काही नोंदीनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. मल्हारराव होळकरांच्या त्या सून झाल्या. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या.
ज्या भारतीय स्रीयांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आपले नाव इतिहासात अजरामर केले त्यामध्ये प्रामुख्याने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव घेतले जाते. याच जन्मस्थळी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे भव्य स्मारक व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या कलाकृतींच्या माध्यमातून उभारलेली चित्र सृष्टी या ठिकाणी पहायला मिळते. या ठिकाणी त्यांचे हे भव्य स्मारक शासनाच्या वतीने निर्माण केलेले आहे.
कर्जत वरुन जामखेड येथे जाताना चौंडी हे ठिकाण लागते. याच महामार्गावरुन आपल्याला उंच पुतळा नजरेस पडतो. आतमध्ये एका मोठ्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताच पुतळ्याच्या समोरच्या बाजूस मोठमोठ्या वृक्षांच्या व फुलझाडांनी बहरलेला बगीचा दिसतो. त्यात राशीचक्राचे माहिती फलक व १२ राशींचे प्रतिकात्मक पुतळे दिसतात. हा बगीचा पाहत आपण पुढे पोहचतो तोच आपल्या नजरेसमोर येतो तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा भव्यदिव्य पुतळा. अतिशय रेखीव व आकर्षक असा हा पुतळा असून अहिल्याबाई होळकर यांचे सर्व वैचारिक अनुयायी या ठिकाणी प्रेरणा घेण्यासाठी येतात व येथे नतमस्तक होतात.
याच पुतळ्याच्या मागील बाजूस त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे व जीवनातील प्रमुख घटना सांगणारे शिल्प तयार करण्यात आले असून त्यावर त्यांचा जन्म, त्यांचे शिक्षण, त्यांचा विवाह, त्यांची न्यायप्रियता उल्लेखीत करणारे, मुरब्बी प्रशासक म्हणून त्यांची ओळख ज्या घटनांमुळे झाली त्या घटना व अशा अनेक महत्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचे चित्ररुपी वर्णन केलेले आहे.
सोबतीला ज्या ठिकाणी जन्म झाला ते जन्मस्थळही वारसा म्हणून जतन केलेले आहे. वाड्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मदिनी त्या पवित्र व प्रेरणादायी वास्तूचे दर्शन घेण्यासाठी त्यांचे असंख्य अनुयायी येतात.
अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. राणी अहिल्यादेवी यांनी पूर्ण भारतात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; माहेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकामही केले.
सण/उत्सव:
अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मदिनाच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक अभिवादन करण्यासाठी येतात.