स्थळ महात्म्य: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिरजगाव येथे भेट दिलेले ठिकाण.
ठिकाणाचा प्रकार: बुद्ध विहार
माहिती:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे २५ जानेवारी १९३७ रोजी सोलापूरहून बार्शी मार्गे अहमदनगर येथे सभेला संबोधित करण्यासाठी जात असताना मिरजगाव या ठिकाणी विश्रांतीसाठी काही काळ थांबले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या गावात आले आहेत असे समजताच तेथे काही वेळात शेकडो लोक जमा झाले. काही चिमुकल्या शाळकरी मुलींनी त्यांचे स्वागत करीत गीतही सादर केले. डॉ. आंबेडकरांनी जमलेल्या लोकांना मार्गदर्शन केले. ते हे प्रेरणादायी ठिकाण म्हणजे आजचे मिरजगावचे बुध्द विहार. या ऐतिहासिक भेटीचा संदर्भ आपल्याला ‘डॉ. बी आर आंबेडकर – खंड १८वा भाग २रा १९३७-१९४५’ यामध्ये प्रकर्षाने दिसतो.
डॉ. आंबेडकरांनी भेट दिलेल्या मिरजगावातील ठिकाणी बुध्द विहार बांधले असून तेथे तथागत गौतम बुध्दांची मूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवलेली आपणास दिसते. अनेक लोकांना ही जागा प्रेरणा देते म्हणून तिचे विशेष महत्व आहे. येथे लोक बऱ्याच वर्षांपासून एकत्रित येऊन समाजहिताचे कार्यक्रम करतात.
सण/उत्सव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, माता रमाई जयंती, शिवजयंती याच बरोबर सर्व महापुरुषांच्या जयंत्या येथे सगळे लोक एकत्र येऊन व्याख्यान किंवा पुस्तक वाटप इत्यादी पध्दतीने साजरे करतात. दर वर्षी बौध्द पोर्णिमेच्या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
स्थानिक वैशिष्ट्ये:
येथील फुटाणे हे संपूर्ण जिल्ह्यात व आजुबाजूच्या जिल्ह्यांमध्ये प्रसिध्द आहे.
त्याचबरोबर हाताने शिवल्या जाणाऱ्या गोधड्यांसाठीही मिरजगाव सुप्रसिध्द आहे.