Description

स्थळाचे नाव: काळविट अभयारण्य, रेहेकुरी

स्थ महात्म्य: हे अभयारण्य १९८० साली काळविटांच्या संरक्षणासाठी निर्माण झालेले हे राज्यातील पहिलेच अभयारण्य आहे.

ठिकाणाचा प्रकार: अभयारण्य

माहिती: अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील दुष्काळी रुक्ष भागात २.१७ चौ किमी क्षेत्रात हे अभयारण्य वसले आहे. प्रामुख्याने काळविटांच्या व इतर प्राण्यांच्या तसेच वनराईच्या रक्षणासाठी या अभयारण्याची निर्मिती २९ फेब्रुवारी १९८० साली करण्यात आली. काळविटांच्या संरक्षणासाठी निर्माण झालेले हे राज्यातील पहिलेच अभयारण्य आहे. काळविटांच्या शिकारीमुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना या अभयारण्यात त्यांची सहाशेच्या जवळपास संख्या  आहे. त्याचबरोबर निम, सिसू, खैर, हिवर, बोर या झाडांच्या तर कुसाळी, डोंगरी मारवेल आणि पवन्या या गवतांच्या जाती येथे आढळतात. पूर्वी या ठिकाणी माळढोक पक्षांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती. कर्जत पासून १० किमी अंतरावर असलेल्या या अभयारण्याच्या आत गेल्यावर समोरील वनराई मन मोहून घेते. येथे असणाऱ्या प्राण्यांना पाहण्यासाठी ठिकठिकाणी मनोरे उभारण्यात आले. त्यावरुन आपल्याला  हे प्राणी सहजपणे पाहता येतात. प्राण्यांमध्ये काळविट, हरीण, ससा, कोल्हा हे प्राणी या ठिकाणी आढळून येतात.

या अभयारण्यात वेगवेगळे लपनगृह उभारण्यात आले असून प्राणी पाणी प्यायला येतात तेव्हा त्यांना त्रास न होता, चाहूल न लागू देता आपण त्यांना जवळून पाहू शकतो. रेहुकरीचे अभयारण्य म्हणजे एक वेगळाच आनंद व अनुभव आहे जो आयुष्यभर लक्षात राहील.

संपूर्ण अभयारण्य पाहण्यासाठी साधारणत: अडीच ते तीन तास लागतात. आतमध्ये पिण्याच्या पाण्याची व जेवणाचीही व्यवस्था आहे. तसेच सुरवातीलाच अभयारण्याची माहिती किंवा काही मदत लागल्यास आपल्याला माहिती केंद्रात मिळते. 

पर्यटकांना आवाहन व विनंती:

  • रेहुकरी अभयारण्यात असलेल्या या प्राण्यांचे व वनराईचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
  • प्राण्यांना कुठलेही खाद्यपदार्थ देऊ नये.
  • तेथील प्राण्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • वनराईची हानी करु नये व त्याची काळजी घ्यावी.
  • तसेच आत अभयारण्यामध्ये प्लॅस्टिक बॅग, किंवा पाणी बॉटल व इतरत्र कचरा या गोष्टी टाकू नये.

     

स्थानिक वैशिष्ट्ये:

  • तालुक्याचे ठिकाण कर्जत येथून जवळ आहे.
  • शिपी आमटी हा खाद्यपदार्थ येथे प्रसिद्ध आहे.