Description

स्थळाचे नाव: लालगीर बुवा समाधी मठ ट्रस्ट व ॐ चैतन्य आत्मारामगिरी महाराज, मांदळी.

स्थ महात्म्य: लालगीर बाबांची संजीवन समाधी व आत्मारामगिरी बाबांचे ३२ वर्षापासून वास्तव्य.

ठिकाणाचा प्रकार: समाधी व मठ.

माहिती:

मांदळी गावात प्रवेश केल्यावर उत्तरेला हा मठ आहे. आत प्रवेश करण्याआधीच आपल्याला स्वागताचे प्रवेशद्वार लागते. पुढे गेल्यावर साधारणपणे ६००-७०० मीटर अंतर चालून गेले की आपल्याला मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दिसते. त्यानंतर भक्तांची बसण्याची व्यवस्था असलेला हॉल आपल्याला दिसतो. पायऱ्या उतरुन गेल्यावर आपण लालगीर बुवांच्या समाधी मंदीराच्या सभामंडपाजवळ जाऊन पोहचतो. समोरच्या बाजूला आपल्याला त्यांची संजीवन समाधी दिसते. तिथे आत फक्त बालब्रह्मचारी असणाऱ्या व्यक्तीला प्रवेश दिला जातो. याच संजीवन समाधीसमोर लालगीर बुवांच्या १८ शिष्यांच्या समाधीचे दर्शन आपल्याला होते. तर उजव्या बाजूला गणपती व मारुतीचे मंदीर दिसते. तिथून या समाधीच्या समोरुन चालत गेल्यावर सभामंडपाच्या आग्नेय दिशेस आत्मारामगीरी महाराज यांची जीवंत वास्तव्य असलेली खोली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी एकाच शारीरिक अवस्थेत खडतर तपश्चर्या करत आहेत. त्याच्याच शेजारी आत्मारामगीरी बाबा यांचे जुने निवासस्थान असून पाठीमागील प्रांगणात एकादशी व विशेष उत्सवाच्या वेळी होणाऱ्या कीर्तनासाठी हॉल आहे. स्वामींचा आशीर्वाद मिळाला की सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रध्दा आहे.

सविस्तर वृत्तांकन

संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन असणाऱ्या नाग बाबा साधु. दशनाम आखाड्याचे साधु महान तपस्वी सद्गुरु लालगीर स्वामींनी संजीवन समाधी १३ व्या शतकात मांदळी ता.कर्जत जि.अहमदनगर या ठिकाणी घेतलेली आहे. तसेच या ठिकाणी महान तपस्वी ॐ चैतन्य आत्मारामगिरी महाराज यांचे जीवंत वास्तव्य ३२ वर्षांपासून आहे.

१) लालगीर बाबा समाधी मंदीर:हे योगी संन्याशी गिरी पंथातील साधू होते. त्यांनी या परिसरात बरीच वर्षे तपश्चर्या केल्याचे सांगण्यात येते व त्यानंतर त्यांनी मांदळी येथेच समाधी घेतली.

२) आत्माराम बाबांची राहण्याची खोली: उन्हाळा पावसाळा हिवाळा या कशाचीही तमा न बाळगता आत्माराम बाबांनी १२ वर्षाची ३ तपं आधी पूर्ण केलेली आहेत. आता सध्या त्यांचे एकाच अवस्थेतील तप चालू आहे. २७ डिसेंबर १९८७ रोजी ते या मठात आले तेव्हापासून त्यांचे येथे वास्तव्य आहे.

३) उजव्या सोंडेचा गणपती.

४) महादेव मंदिर.

५) लालगीर बुवांच्या शिष्यांच्या समाध्या.

६) गोशाळा.

सण/उत्सव:

  • प्रत्येक एकादशीला भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात.
  • आषाढी एकादशीला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.
  • या काळात भक्तांसाठी अन्नदानाची सोय असते तसेच विशेष कीर्तनसेवाही या दिवशी पार पडते
  • विजयादशमी – या दिवशी होमाचा मोठा कार्यक्रम होतो व महाप्रसाद म्हणून भोपळ्याची भाजी केली जाते. तदनंतर स्वामींची पालखी ग्रामदर्शनासाठी निघते व सर्वांना भोपळा भाकरी देऊन उत्सवाची सांगता होते.
  • याचबरोबर दत्तजयंती, महाशिवरात्री, आषाढी दिंडी सोहळा हे उत्सव देखील मोठ्या आनंदात भाविक भक्त साजरे करतात.