माहिती:
श्री अनखेरी आई मंदीर हे प्राचीन हेमाडपंथी मंदीर असून या देवस्थानाचे मुळ स्थान माहुर गड आहे. त्याचे बांधकाम १६ व्या शतकातील आहे. श्री अनखेरी देवी ही मुळ माहुर गड निवासिनी रेणुका देवी असून याची एक जुनी कथा सांगण्यात येते. एक व्यापारी या ठिकाणी हिरे माणिक मोती यांचा व्यापार करत असे. एक दिवस देवी एका लहान मुलीच्या रुपात जांभळीच्या झाडाला झोका खेळत होती त्यावेळी देवीने विचारले की, ‘तुम्ही या गोण्या मधून काय चालविले आहे?’ त्यावेळी तो व्यापारी देवीला खोटे बोलला की यामध्ये मीठ आहे. त्यावर तो व्यापारी नदी ओलांडून पुढील गावी गेला. नंतर त्याने आपल्या गोण्या उगडून पहिल्या तर त्यामध्ये हिरे माणिक मोती या ऐवजी मीठ झाले होते. आपली चूक त्या व्यापाऱ्याला लक्षात आली व आपण खोटे बोलले असून त्याला स्वतः अपराधी असल्याची भावना निर्माण झाली. तो परत आला व त्याने त्या लहान मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला पण ती कुठेच सापडली नाही. तेथे दोन दगडी पादुका दिसल्या व त्यावर त्याने आपले डोके ठेवले. ‘मी आपले मंदिर बांधून देईल’, असे कबुली दिली व त्यावर देवी प्रगट झाली अशी आख्यायिका सांगितली जाते.