Description

स्थळाचे नाव: सिद्धटेक सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक

स्थ महात्म्य: अष्टविनायकमधील तिसरा गणपती सिद्धटेक सिद्धिविनायक हे अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात आहे.

ठिकाणाचा प्रकार: मंदिर

माहिती:

सिद्धटेक सिद्धिविनायक मंदिर येथील गणेश मूर्तीची स्थापना प्रत्यक्ष श्री भगवान विष्णू यांनी केली आहे असे सांगण्यात येते. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची ही एकमेव गणपतीची मूर्ती आहे. उजव्या सोंडेच्या मूर्तीस सिद्धिविनायक असे संबोधले जाते. येथील सिद्धिविनायकाची मूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी ५ कि.मी चालावे लागते. परिसर प्रशस्त असून प्रवेश करण्यासाठी मोठे दगडी महाद्वार आहे.

पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विष्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र त्यांना त्यात यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करुन विष्णूने असुरांचा वध केला अशी आख्यायिकाही सांगितली जाते.

या मंदिरास इतिहासही आहे. छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे  सेनापती हरीपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. परंतु काही कारणास्तव हरिपंत फडके यांचे सेनापती पद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांना सेनापती पद परत मिळाल्याची नोंद आहे. 

सण/उत्सव:

  • गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो.
  • प्रत्येक महिन्यातील चतुर्थी साजरी होते.
  • सहा महिन्यातून येणाऱ्या अंगारखी चतुर्थी साजरी होते.

स्थानिक वैशिष्ट्ये:

  • चामड्याच्या वस्तू – सिद्धटेक येथील चामडे कामगारांच्या विशेष कौशल्याने बनवलेले चामड्याचे बेल्ट आणि चामड्याचे मनी पाकीट हे विशेष उल्लेखनीय व प्रसिद्ध आहे.
  • भीमा नदीच्या तीरावर पालं पडतात (यात्रा/उत्सवाच्या वेळी) त्यावेळी या पालांवर मिळणारं चुलीवरचं रुचकर पिठल भाकरी व ठेचा हे खाण्यासाठी खवय्ये भाविक आठवणीने त्याचा आस्वाद घेतात.