Description

स्थळाचे नाव: सद्गुरु गोदड महाराज मंदीर, कर्जत

स्थ महात्म्य: कर्जत येथील हे देवस्थान राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असून कर्जत वासीयांचे ग्रामदैवत आहे.

ठिकाणाचा प्रकार: संजीवन समाधी मंदिर

माहिती:

सद्गुरू गोदड महाराज यांचा जन्म शके १६ श्रावण शुध्द दशमी गुरुवार पुष्प नक्षत्रावर उदयपूरचे भोसल्यांच्या राजघराण्यात झाला. त्यांचे आजोळ हे कर्जत (तत्कालीन कर्णग्राम) येथे झाला. अमृतसिंह/अमृत अशी विविध जन्मनाव असली तरी पुढे ते गोदड महाराज याच नावाने सर्वपरिचित झाले. राजघराण्यात जन्म झाला असला तरी लहानपणापासून कोणत्याही भौतिक गोष्टींची लालसा त्यांच्या मनात नव्हती. वैराग्याचा विचार असलेले महाराज सतत पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग राहत. त्यांचा स्वभाव निर्भय, शीघ्रकोपी पण क्षमाशील होता. पांडुरंगाच्या नामस्मरणात त्यांना आनंद मिळे.

महाराजांनी सातपुडा पर्वतावर १७ वर्ष खडतर तपश्चर्या केली, पांडुरंगाच्या भेटीसाठी महाराज पंढरपूर येथे गेल्यानंतर तिथे त्यांचा एका तत्कालीन उच्चकुलीन मानल्या जाणाऱ्या स्री कडून अपमान झाल्याची घटना घडली असे सांगण्यात येते. त्यामुळेच संतप्त महाराजांनी देहत्यागाची तयारी केली परंतु भगवंताच्या साक्षात्कारी उपदेशाने त्यांना कर्जत ग्रामी येऊन तेथे समाधीस्त व्हावे अशी भगवंताची आज्ञा मिळाली व स्वतः पांडुरंगाने नित्यनियमाने तुला भेटायला कर्जत ग्रामी येईल असे वचन दिले. आजही कर्जत येथून पंढरपूरला पालखी न जाता पंढरपुराहून कर्जत येथे पालखी गोदड महाराजांच्या भेटीस येते. नंतर त्यांनी कर्जत येथेच संजीवन समाधी घेतली. विशेष म्हणजे महाराजांनी स्वतः जीवंत असतांना ही समाधी बांधून घेतलेली होती.

महाराजांनी आपल्या जीवीत काळात अनेक महत्वाच्या तत्वज्ञान, अध्यात्म, वैद्यक शास्र यांसारख्या विषयांवर विपुल लेखन केले. त्यांच्या कर्जत येथील वास्तव्यात त्यांनी अनेक रुग्णांवर यशस्वी औषधी उपचार केले. त्यांच्या या सर्व ग्रंथांचे व इतर सामग्री यांचे दर्शन आपल्याला मंदीराच्या मागील बाजूस घेता येते.

सण/उत्सव:

  • माघ वद्य चतुर्दशीला मोठा समाधी सोहळा होतो
  • गुढीपाडव्याला संवत्सर सोहळा असतो.
  • प्रत्येक एकादशीला दिंडी व कीर्तन असते
  • रथ यात्रा – कामीका एकादशीला व पायी दिंडीला असते.

 

स्थानिक वैशिष्ट्ये:

  • शिपी आमटी – शिप्याची आमटी हा पदार्थ कर्जत मधील प्रसिध्द पदार्थ आहे. येथे येणाऱ्या पाहुण्यांना हा पदार्थ विशेषतः पाहुणचार म्हणून केला जातो. अनेक हॉटेलमध्ये शिप्याची रुचकर आमटी, चपाती – भाकरी, भात व खारे शेंगदाणे अशा अनोख्या पण स्वादिष्ट चवीसह मिळते.

Photos