स्थळाचे नाव: निंबाळकर गढी व सुलतानजी निंबाळकर यांची समाधी
स्थळ महात्म्य: ही गढी ऐतिहासिक खर्डा किल्ला बांधणारे सुलतानजी निंबाळकर यांनी बांधलेली असुन तिथून जवळच त्यांची कोरीव व अतिशय रेखीव असलेली समाधी आहे.
ठिकाणाचा प्रकार: गढी व समाधी
माहिती: खर्डा गावामध्ये मध्यवस्तीत असलेली ही दोन मजली भव्य निंबाळकरांची गढी अतिशय महत्वाची ऐतिहासिक वस्तू असून त्याची निर्मिती १७४३ साली सुलतानजी निंबाळकर यांनी खर्ड्याचा किल्ला बांधला त्याचवेळी केल्याची नोंद इतिहासात मिळते. भक्कम पाया व चार बुरुजांमध्ये सुरक्षितपणे डौलदार पध्दतीने उभ्या असलेल्या या गढीचे वैशिष्ट्ये म्हणजे नक्षीकाम केलेले भक्कम उंच लाकडी प्रवेशद्वार, बारमाही म्हणजे अगदी कडक दुष्काळातही उंचावर पाणी असणारी बारव (विहिरीचा एक प्रकार) व गढीच्या आत असलेले भुयार. या भुयाराची वैशिष्ट्य असे आहे की या भुयारीमार्गे थेट शिवपट्टणशिवपट्टण किल्ल्यावर जाता येते. गढीच्या आत आल्यावर मध्यभागी पसरलेले प्रशस्त मैदान व त्यासोबत असलेली इमारत आजही सुलतानजी निंबाळकर यांच्या कारकिर्दीची आठवण करुन देते. रयत शिक्षण संस्थेची खर्डा येथील शाळा बरेच वर्षे या गढीवरती भरत होती, परंतु १९९३ च्या भूकंपानंतर सुरक्षेच्या दृष्टीने हे वर्ग नंतर दुसरीकडे भरविण्यास सुरवात झाली. गढीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे उंचावर असल्यामुळे या गढीवरुन खर्ड्याचा व आजूबाजूचा संपूर्ण परिसर न्याहाळता येतो.
सुलतानजी निंबाळकर यांची समाधी: गढीपासून ५०० ते ६०० मीटर अंतरावर ही सुलतानजी निंबाळकर यांची समाधी असून त्यावरील कोरीव कामासाठी ती विशेष प्रसिद्ध आहे. निजामशाहीसोबत सलोख्याचे संबंध असणारे सुलतानजी निंबाळकर यांचे मराठा साम्राज्यासोबतही चांगले संबंध होते. १७४८ साली त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृतीत या कोरीव समाधीचे निर्माण त्यांचे वंशज हणमंतराव यांनी केल्याचे सांगण्यात येते.
स्थानिक वैशिष्ट्ये: • खर्डा येथील शिवपट्टण किल्ला येथुन जवळच आहे. • बस स्टॉप जवळच मिळणारी खारी पापडी भेळ ही खायला कुरकुरीत व स्वादिष्ट लागते. या पापडीला जिल्हाभरातून खवय्यांची प्रचंड मागणी आहे.