माहिती: अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील दुष्काळी रुक्ष भागात २.१७ चौ किमी क्षेत्रात हे अभयारण्य वसले आहे. प्रामुख्याने काळविटांच्या व इतर प्राण्यांच्या तसेच वनराईच्या रक्षणासाठी या अभयारण्याची निर्मिती २९ फेब्रुवारी १९८० साली करण्यात आली. काळविटांच्या संरक्षणासाठी निर्माण झालेले हे राज्यातील पहिलेच अभयारण्य आहे. काळविटांच्या शिकारीमुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना या अभयारण्यात त्यांची सहाशेच्या जवळपास संख्या आहे. त्याचबरोबर निम, सिसू, खैर, हिवर, बोर या झाडांच्या तर कुसाळी, डोंगरी मारवेल आणि पवन्या या गवतांच्या जाती येथे आढळतात. पूर्वी या ठिकाणी माळढोक पक्षांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती. कर्जत पासून १० किमी अंतरावर असलेल्या या अभयारण्याच्या आत गेल्यावर समोरील वनराई मन मोहून घेते. येथे असणाऱ्या प्राण्यांना पाहण्यासाठी ठिकठिकाणी मनोरे उभारण्यात आले. त्यावरुन आपल्याला हे प्राणी सहजपणे पाहता येतात. प्राण्यांमध्ये काळविट, हरीण, ससा, कोल्हा हे प्राणी या ठिकाणी आढळून येतात.