१९७०च्या दशकातील कर्जतचे चलते फिरते आकाशवाणी केंद्र – तोतीभाई
एखाद्या सुखाच्या बातमीपासून ते दुखाच्या बातमीपर्यंत मोर्चा,बंद,आंदोलन,निषेध,नम्र आवाहन,पाणी कधी सुटनार, नाही सुटणार, व्यक्ती अथवा मौल्यवान वस्तु गहाळ माहिती,अखंड हरिनाम सप्ताह,भंडारा, वास्तुशांती,उद्धघाटन,स्थलांतर,टूरिंग टाकीजवर कोणता चित्रपट लागला आदिंसह ग्रामपंचायत,वित्तीय संस्था आदींच्या घडामोडी,सभांची माहिती कर्जत नगरीला “तोतीभाई किंवा तोतीराम”यांच्या पत्र्याच्या भोंग्याद्वारे होत असे आजच्या माध्यमांचा विचार करता ते कर्जतचे चलते फिरते आकाशवाणी केंद्र म्हटले तरी वावगे ठरू नये.पूर्वी कर्जत हे जरी तालुक्याचे गाव असले तरी ते मर्यादित होते.सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संकुले वगळता बाकी कुठलीही फारशी ओळख नव्हती.त्या काळात वर्तमानपत्र आणि रेडीओ वगळता इतर माध्यम दुरापास्त होती.
त्या काळात रेडीओ हे श्रीमंतीच लक्षण बोलले जात.अशा या काळात स्थानिक,तालुक्यातील ,जिल्ह्यातील,राज्य आणि देशपातळीवरील माहिती सर्व समान्यांपर्यंत पोहचणे कठीण होते.अशावेळी तोतीभाईंचा भोंगा हे सर्व समान्यांचे चलते फिरते वर्तमानपत्र,रेडीओ आकाशवाणी केंद्र होते जुन्या लोकांकडून सांगण्यात येते.१९६५ते२०००सालापर्यंत हा तोतीभाईंचा प्रवास अविरतपणे चालला.परंतू पुढे काळानुरूप आलेल्या माध्यमांपुढे तोतीभाईंच्या भोंग्याचा निभाव लागला नाही.त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांना कर्जतहुन स्थलांतर करावे लागले.आजही काही शौकीन त्यांना आवर्जून बोलावतात.
भोंग्याच्या प्रवासाविषयी बोलताना तोतीभाईंचा हा प्रवास अतिशय संघर्षमय आणि तितकाच रंजक वाटला.तोतीभाईंचे मूळनांव “सय्यद नशिर सय्यद लाल”लहानपनापासून परिस्थिती हलाकीची तीन भाऊ चार बहिणींचे कुटुंब हाकताना. वडिलांची मोठी दामछाक होत असे वडील तसे स्वातंत्र्यसैनिक परंतू अखेरपर्यंत उपेक्षित राहिलेले.स्वातंत्र्यानंतर त्यांनी भित्तीपत्रक चिटकाविणे,रंगविणे,असा व्यावसाय केला नंतर स्वस्त धान्य दुकानावर मापाड़ी काम केले.हे कुटुंब तसे कलापूजक असल्याने थोरले बंधू रज्जाक हे प्रसिद्ध चित्रकार आणि पेंटर होते.त्यांना कर्जतमध्ये ‘अफुवाले पेंटर’म्हणून ओळखले जात.कर्जत तालुक्यातील बहुतांश शाळा,विद्यालयामध्ये महापुरुषांचे आणि देवी देवतांचे चित्र त्यांनीच रेखाटलेले.तोतीभाईंना हलाकीच्या परिस्थितिमुळे सहावीतुन शाळा सोडावी लागली.जगण्यासाठी रोजगारांच्या साधनांचा शोध सुरू झाला.घरातून कलेचा वारसा असल्याने एक कल्पना सुचली आणि परिस्थितीने हाती भोंगा दिला.एक पत्र्याचा भोंगा तिला गळयात अडकविण्याची दोरी, तिरंगा,त्यावर 786 या भांडवलावर आणि कलेच्या उमेदीवर१९६५ साली वयाच्या १५व्या वर्षी परिस्थितीने हाती भोंगा दिला. भोंग्याचा प्रवास सुरू झाला.या भोंग्याने व्यावसायाबरोबर ‘नशिर’नांव पुसले.मुस्लिमांनी”तोतीभाई”आणि हिंदूंकडून”तोतीराम”हे नांव आणि वेगळी ओळख दिली.आणि भोंग्याचा प्रवास अखंड सुरू राहिला.
गावातील मोठमोठ्या घरातील लोक सुख दुखांच्या माहितीसाठी बोलवू लागले.कारखान्याच्या सभा,गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या निवडणुकांच्या सभा,मतदान,मतमोजणीच्या तारखांची माहिती,टूरिंग टाकीज(खुले सिनेमागृह)वर कोणता सिनेमा लागला हे सांगन्याची भाईंची खुमासदार शैली त्या चित्रपटाचे आकर्षण वाढवायची.
गांधी टोपी,पायजमा शर्ट घालणारे तोतीभाई हे कलापूजक असल्याने भोंग्याच्या सुरुवातीला हूर……ऐका…..अशा पहाड़ी डरकाळीने त्यांची सुरवात होत असे त्याकाळी ही आरोळी ऐकताच अबालवृद्धान्चे लक्ष भोंग्याकडे वेधले जात.पुढे काय?या प्रश्नाने अनेकजण आतुर व्हायचे.म्हणुन त्यांना चालते फिरते आकाशवाणी केंद्र संबोधले जायचे.त्यांच्या भोंगा सांगण्याच्या शैलीने अनेकजण त्यांचे चाहते व्हायचे.रेडीओवरील एखाद्या खऱ्याखूर्या निवेदकाप्रमाणे आणि सूत्रसंचालकांप्रमाणे त्यांची बोलण्याची शैली असायची.काही जण या कलेला उत्स्फूर्त दाद द्यायचे तर काही जण टवाळीही करायचे.हे भाई खेदाने सांगतात.एका भोंग्याचे त्यांना त्याकाळी दोन ते चार रुपये मिळायचे यातही तोतीभाईना एक आत्मिक समाधान वाटायचे.आमदनी कमी असली तरी कलेला दाद देणाऱ्यामुळे एक ऊर्जा आणि उभारी मिळायची.अनेक लोकांच्या शुभकार्याची सुरुवात तोतीभाईच्या भोंग्याने व्हायची.कर्जतकरांनी खूप प्रेम दिले हे भाई सद्गादित होऊन सांगतात.
रेडीओची आठवण सांगताना तोतीभाई सांगतात की,कर्जतमध्ये त्याकाळी बाजारतळावर युसूफभाई यांची पानटपरी होती.आणि त्यांचेकड़े सेलवर चालणारा त्या काळातला ब्रयान्डेड रेडीओ होता.सायंकाळी रेडीओवर’बिना का गीतमाला’ऐकायला शौकीनांची मोठी गर्दी व्हायची सदाबहार गीतांबरोबर प्रसिद्ध निवेदक आमीन सायानी यांच्या निवेदनातुन खूप प्रेरणा मिळायची.भोंग्यावर बोलताना या निवेदनातून प्रेरणा मिळायची असे तोतीभाई सांगतात.
१९६५ते २०००साला दरम्यान भोंग्याने उदरनिर्वाहासह प्रेम ही भरपूर दिले.भोंग्याच्या प्रवासादरम्यान लग्नानंतर दोन मुले एक मुलगी असा प्रपंच झाला.अलीकडच्या काळात वाढलेली वेगवेगळी माध्यमे आपल्या कल्पना शक्तीच्या बाहेर गेल्याने कालांतराने आपला भोंगा कालभह्य झाल्याने आपला निभाव लागणार नाही असे जाणवल्याने कर्जत गावातून उदरनिर्वाहासाठी इतरत्र स्थलांतर करावे लागले.तरीही काही शौक़ीन आणि कलेचे कदरदान असणाऱ्या माणसांच्या जिव्हाळ्यापोटी अधुनमधून कर्जतला येतो.भोंग्याच्या प्रवासादरम्यान ईमानेइतबारे सेवा केली परंतू आजही सत्कार,सन्मान आणि शासकीय योजनांपासून वंचित असल्याची खंत मनामध्ये असल्याचे तोतीभाई सांगतात.वयाच्या ६०,६५वर्षीही कर्जतला आल्यावर लोक मला प्रेम देतात.याने माझे दुःख निश्चित हलके होते यात शंका नाही असे तोतीभाई समाधानाने सांगतात.
-मुन्ना पठाण,कर्जत मो.९९२१६९७९५०
(तालुका प्रतिनिधी,कर्जत)